बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरू होताच शेत, माळराने आणि जंगल परिसरात जंगली आळंबी मोठ्या प्रमाणात उगवू लागते. चविष्ट असल्याने अनेक जण ती गोळा करून खातात. मात्र, योग्य ओळख न पटवता जंगली आळंबीचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील उमराणी येथे अशाच प्रकारात एकाच कुटुंबातील ९ जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे.
जिद्दीमनी आणि कोळी कुटुंबातील सदस्यांनी शेतातून जंगली आळंबी आणून तिची भाजी करून खाल्ली. त्याच शेतातून दुसऱ्या कुटुंबानेही आळंबी आणून सेवन केले. मात्र, त्या शेतात यापूर्वी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली होती. याची माहिती नसल्याने आळंबी खाल्ल्यानंतर काही वेळातच संबंधितांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
स्थानिकांनी सर्वांना तातडीने चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल केले. एका गर्भवती महिलेची प्रकृती लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून कोणालाही जीविताचा धोका नसल्याची माहिती दिली.
जंगली आळंबी हे पावसाळ्यात जमिनीतून उगवणारे नैसर्गिक खाद्य असले, तरी प्रत्येक आळंबी खाण्यायोग्य असतेच असे नाही. तसेच ती ज्या ठिकाणी उगवली आहे, तेथे कीटकनाशके किंवा रसायनांचा वापर झाला आहे का, याचीही खात्री करणे आवश्यक आहे. त्यामुळे जंगली आळंबीची योग्य पारख करूनच तिचे सेवन करावे, अन्यथा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.




