belgaum

चव्हाट गल्लीच्या समस्यांचा पाढा.. ‘वाढता वाढता वाढे….’!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावमधील चव्हाट गल्ली येथे प्रशासनाकडून सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या अनाठायी आणि नियोजनशून्य कामामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या भागात, समस्येचे निवारण करण्याऐवजी ड्रेनेजच्या नवीन कामादरम्यान जुन्या मुख्य जलवाहिन्याच फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पुरवठा होणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ पाण्यात आणि गल्लीतील विहिरींमध्ये ड्रेनेजचे सांडपाणी थेट मिसळत असून, स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला ड्रेनेज जोडणी देण्याचे आश्वासन देऊन कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेने नागरिकांकडून प्रत्येकी २०० ते ५०० रुपये गोळा केले होते. मात्र, पैसे घेऊनही अद्याप अनेक जोडण्या अपूर्णच ठेवण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

चालू कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे व ठिसूळ पाईप्स वापरण्यात आले असून त्यांच्या जोडण्याही व्यवस्थित न केल्याने जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या संपूर्ण आर्थिक आणि तांत्रिक प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

 belgaum

सध्याच्या ड्रेनेजच्या समस्येसोबतच चव्हाट गल्लीतील एकूण नागरी समस्यांचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला आहे. चव्हाट गल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अलीकडेच जवळपास सलग ७ ते ८ दिवस गल्लीत पाणीच सोडले गेले नव्हते. आधीच पाणी नाही आणि त्यात ड्रेनेजच्या कामामुळे जलवाहिन्या फुटल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.

अत्यंत गंभीर बाब म्हणजे, पाईपलाईनच्या निकृष्ट कामामुळे पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे सांडपाणी मिसळत आहे. केवळ दुर्गंधीच नाही, तर काही नागरिकांना नळाला आलेल्या पाण्यात चक्क बारीक कीटकही आढळून आले आहेत. यामुळे परिसरात आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला असून कॉलरा, गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांची भीती पसरली आहे.

लागोपाठ अनेक दिवस पाणी न मिळाल्याने आणि त्यातही दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील महिलांनी याविरोधात काही दिवसांपूर्वी हातात रिकाम्या घागरी घेऊन थेट रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

या परिस्थितीची बातमी लावून धरल्यानंतर आणि महिलांचे आक्रमक आंदोलन पाहिल्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येची दखल घेतली. मात्र या समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यात आला, आणि परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यात न आल्यास प्रशासनाला नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.