belgaum

श्री मंगाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तयारी; गाऱ्हाणे घालून ‘वार’ सोडले

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवी यांच्या वार्षिक यात्रोत्सवाची धार्मिक परंपरेनुसार आज गाऱ्हाणे घालून ‘वार’ सोडण्याचा विधी भक्तिमय वातावरणात पार पडला. या विधीनंतर यात्रेच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून, संपूर्ण वडगाव परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री मंगाई देवीच्या यात्रेला सीमाभागातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक यात्रांपैकी एक मानले जाते. दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी वडगावमध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे ही यात्रा शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य भाविकांची यात्रा म्हणून ओळखली जाते. कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यांतूनही भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेला उपस्थित राहतात.

शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या ‘वार’ सोडण्याच्या धार्मिक विधीनंतर पुढील एक महिन्याचा पवित्र कालावधी सुरू झाला आहे. या कालावधीत देवीला नारळ फोडला जात नाही तसेच ओटीही भरली जात नाही, अशी शेकडो वर्षांपासूनची धार्मिक परंपरा आजही भाविकांकडून अत्यंत श्रद्धेने पाळली जाते. या काळात भक्त देवीची मनोभावे पूजा करून यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात.

 belgaum

यात्रेपूर्वी मंगळवार आणि शुक्रवार असे मिळून एकूण नऊ वार पाळले जाणार आहेत. प्रत्येक वाराला मंदिरात विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.

यंदाचा श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव ११ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान गाऱ्हाणे उतरविण्याचा प्रमुख धार्मिक विधी पार पडणार असून, या विधीसाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. देवीसमोर गाऱ्हाणे मांडून भक्त आपल्या मनोकामना व्यक्त करतात आणि त्यानंतर गाऱ्हाणे उतरविण्याचा सोहळा पार पडतो. मग यात्रोत्सवाला सुरुवात होते.

यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुमारिका देवीला जल अर्पण करण्याची परंपरा. विविध भागांतील कुमारिका देवीला जल अर्पण करण्यासाठी मंदिरात येतात. या कुमारिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनाला वेग आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांकडून व्यापक तयारी सुरू असून, यंदाही श्री मंगाई देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.