बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज सकाळी बेळगाव येथे सुरू झाली. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांच्यासह सर्व सह सरकार्यवाह, विविध विभागांचे प्रमुख, कार्यकारिणी सदस्य आणि देशभरातील ४६ प्रांतांचे प्रांत प्रचारक उपस्थित आहेत.
बेळगावमधील अनगोळ येथील संत मीरा शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय वार्षिक प्रांत प्रचारक बैठक आजपासून सुरू झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने संघाच्या आगामी शताब्दी वर्षाचे नियोजन, शाखा विस्तार आणि सद्य राजकीय घडामोडींवर मंथन केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात ३५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम परिसरात ड्रोन उडवण्यास तसेच माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मार्च २०२६ नंतर संपन्न झालेल्या संघाच्या विविध प्रशिक्षण वर्गांचा वृत्तांत आणि शाखा पातळीवरील कार्ययोजनेच्या अंमलबजावणीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच संघ शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या शाखा विस्ताराची समीक्षा आणि आगामी काळातील कमाल शाखा विस्तार योजनेवरही विचारमंथन होईल.
यासोबतच शताब्दी वर्षातील उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन आणि सरसंघचालकांच्या आगामी वर्ष २०२६-२७ च्या प्रवास योजनेचा आढावा घेतला जाईल. संघ शताब्दी वर्षाचे उर्वरित कार्यक्रम आगामी विजयादशमी म्हणजेच २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहेत.




