belgaum

एलअँडटीच्या सावळा गोंधळ, चव्हाट गल्लीतील नागरिक त्रस्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एल अँड टी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून महापालिका आणि लोकप्रतिनिधींविरोधात परिसरात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी एकत्र येत प्रसारमाध्यमांसमोर आपल्या तीव्र व्यथा मांडल्या आहेत.
राकसकोप जलाशय पूर्ण भरलेला असतानाही चव्हाट गल्ली परिसरात आठ ते पंधरा दिवसांतून एकदाच पाणी सोडले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पाण्यात पुरेसा दाब नसल्यामुळे घरगुती मोटर पंप लावूनही नळाला पाणी येत नाही. त्यातच एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या नावाखाली रस्ते खोदून नळांचे मुख्य जोडणी कनेक्शन आणि पाइपलाइन कापून टाकल्या आहेत. त्यामुळे एका घराला पाणी येते तर शेजारील चार-पाच घरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. नियमित पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून तात्पुरत्या पाइपलाइनची दुरुस्ती करावी लागत आहे.

पाणीटंचाईसोबतच दूषित पाणीपुरवठ्यामुळे गल्लीत आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गढूळ आणि अस्वच्छ पाणी प्यायल्याने लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे.

 belgaum

काही नागरिकांना उपचारासाठी थेट रुग्णालयात दाखल करावे लागले असून १० ते २० हजार रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च सोसावा लागत आहे. तसेच परिसरात एकाच वेळी ड्रेनेज आणि पाइपलाइनचे काम सुरू असल्याने गटाराचे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही अपुरा पडत असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

या समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि आमदार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त रहिवाशांनी केला आहे. फोन केला तरी लोकप्रतिनिधी फोन उचलत नाहीत. केवळ प्रसिद्धीसाठी चौकात कुदळ मारून फोटो काढण्यापुरतेच नेते येतात, मात्र प्रत्यक्षात गल्लीत येऊन समस्या जाणून घेत नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला.

एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्यक्ष जागेवर येऊन कापलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती करावी आणि दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.