बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या आणि डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आणि दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच एल अँड टी कंपनीच्या कामानंतर या रस्त्याची दुरवस्था अधिकच वाढली आहे.
या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खराब रस्त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असून उन्हाळ्यात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून या मार्गावरील खड्ड्यात आता पाणी साचत आहे शिवाय आजूबाजूला असलेल्या मातीचा चिखल झाल्याने या मार्गावरून वाट काढण्यासाठी सर्वांनाच कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून रुग्णवाहिका आणि शालेय वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने महापालिका प्रशासनाला निवेदने देण्यात येत आहेत. अलीकडेच येथील समाजसेवक गणेश दड्डीकर आणि नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार १५ जून रोजी विभाग अधिकारी शिल्पा जयराम यांनी न्यू गुड्स शेड रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती.
यावेळी रस्त्याची दयनीय अवस्था निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या पाहणीनंतर पुढील कोणतीही ठोस कारवाई किंवा कामाची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

केवळ पाहणी करून आणि आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याऐवजी प्रशासनाने या प्रश्नाकडे गंभीर सार्वजनिक समस्या म्हणून पाहावे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
केवळ तात्पुरते खड्डे न बुजवता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्क्या गटारी उभारण्यात याव्यात, दररोज या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी परिसरातून केली जात आहे.





