बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चा किंवा निदर्शनांसाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करणाऱ्यांना बेळगाव शहर पोलिसांनी इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशातून कोणतेही आंदोलन किंवा मोर्चा आयोजित करण्यापूर्वी पोलीसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
भूषण बोरसे यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात सोशल मीडियावरून विशिष्ट ठिकाणी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा मोर्चा किंवा आंदोलनांचा थेट परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होतो. काही प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे आंदोलन किंवा मोर्चा आयोजित करणाऱ्या व्यक्तींनी सर्वप्रथम पोलीसांची परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच सोशल मीडियावर आवाहन करावे, असे त्यांनी आवाहन केले.
पोलीसांची पूर्वपरवानगी न घेता सोशल मीडियावर नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटीस बजावण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, परवानगीशिवाय केलेल्या आवाहनामुळे नागरिक एकत्र येऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची थेट जबाबदारी संबंधित आवाहन करणाऱ्या व्यक्तीवर राहील, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व नागरिकांनी बेळगाव शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.





