बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांपैकी केवळ ७ तालुक्यांमध्येच आतापर्यंत सरासरीइतका पाऊस झाला असून, संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता पावसात २० टक्के घट नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
२० टक्क्यांपर्यंतची घट ही सामान्य मानली जात असली, तरी सध्याची हवामान परिस्थिती अतिशय वेगाने बदलणारी असल्यामुळे पुढील नियोजनासाठी पावसाच्या पुढील टप्प्यांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे.
जिल्ह्यातील मुख्य नद्या आणि धरणांमधील सद्यस्थितीचा आढावा देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे कृष्णा नदीमध्ये सध्या ८५,००० ते ९०,००० क्यूसेक एवढी पाण्याची मोठी आवक सुरू आहे. हे पाणी अत्यंत नियंत्रित पद्धतीने खाली सोडले जात असून, पिण्याच्या पाण्यासाठी उपसा केला जात आहे.
तसेच घटप्रभा नदीवरील हिडकल धरणाची एकूण साठवण क्षमता ५१ टीएमसी असून सध्या तेथे २५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी कालव्यांमधून सुमारे ०.५ ते १ टीएमसी पाणी सोडण्याची शिफारस प्रादेशिक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दुसरीकडे मलप्रभा धरणातील परिस्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. सध्या मलप्रभा धरणात केवळ १४ टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा २९ टीएमसी इतका होता. बदामी व आसपासच्या परिसरातील शेतकरी संघटनांकडून ऊस व इतर उभ्या पिकांच्या संरक्षणासाठी धरणातून पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
यावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, पुढील वर्षाच्या मे महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. शेतकऱ्यांची पिके वाचवणे आणि बागलकोट परिसरातील मागणीचा विचार करून आपण स्वतः प्रादेशिक आयुक्तांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण पूर्णपणे सुरक्षित ठेवून, पिकांसाठीही शक्य तितके पाणी सोडण्याचा मार्ग काढला जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला.





