belgaum

बेळगावात काँग्रेसविरोधात भाजपचा एल्गार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणे, देशविरोधी घोषणाबाजी आणि भाजप आमदारावर अंडीफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करत तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या या कृत्यविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा काँग्रेस भवनाला घेराव घालण्याच्या उद्देशाने पुढे सरकत होता. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना वाटेतच रोखले. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. कार्यकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स बाजूला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मोर्चा रोखण्यात यश मिळवले.

या आंदोलनादरम्यान भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. दिल्ली तसेच स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या आड काँग्रेस स्वतःचे राजकीय हित साधत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना आमचा पाठिंबा आहे, परंतु आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी घटकांचा वापर आणि पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह भाषा अजिबात सहन केली जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. तसेच बेळगावच्या शांतताप्रिय वातावरणात स्वातंत्र्याची किंवा देशविरोधी मागणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

त्याचप्रमाणे, माजी आमदार अरविंद पाटील यांनी बंगळुरू येथे भाजप आमदारावर झालेल्या अंडीफेकीच्या घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार केला. राज्यातील काँग्रेस सरकार शेतकरी आणि दुष्काळग्रस्त जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

निदर्शनानंतर माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आंदोलनाच्या व्हिडिओ क्लिप्सची बारकाईने तपासणी करून देशविरोधी विधाने करणाऱ्यांवर आणि पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या आंदोलनात पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.