बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे अर्ध्या हंगामाएवढा पाऊस झाला असून, जिल्ह्यातील परिस्थितीत सुधारणा झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
सोमवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. पुढेही चांगल्या पावसाची अपेक्षा असल्याने कालव्यांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील काही भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, त्या भागांचे सर्वेक्षण केले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन आवश्यक मदतीबाबत निर्णय घेईल. काही ठिकाणी पिकांची स्थिती चांगली आहे, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून सर्वेक्षणाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाईल.
कर्जमाफीबाबत सरकारच निर्णय घेईल
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता, हा निर्णय शासन स्तरावर होणार असून त्याबाबत योग्य वेळी सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हावा
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते म्हणाले की, तो कधीही झाला तरी लवकर झाला तर चांगलेच. काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावला तीन मंत्रिपदे मिळावीत
बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली तर चांगले होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र यासाठी कोणाकडेही मागणी केलेली नसून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले.
२०२८ ची निवडणूक सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्ष संघटनेत अधिक सक्रिय होतील का, या प्रश्नावर ते म्हणाले की, २०२८ ची विधानसभा निवडणूक सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल.
अहिंदा नेतृत्वावर भाष्य टाळले
अहिंदा नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर सध्या अधिक बोलण्याची गरज नसून योग्य वेळी सर्व स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
दुधाच्या दरवाढीवर योग्य निर्णय
दुधाच्या दरवाढीच्या मागणीबाबत संबंधित मंत्री परतल्यानंतर सरकार योग्य निर्णय घेईल, असे जारकीहोळी म्हणाले.
एसआयआर प्रक्रियेचा गैरवापर होत नसल्याचा दावा
विशेष मतदार सघन पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांनी सांगितले की, एसआयआर प्रक्रिया सुरळीत सुरू असून नियोजित वेळेत पूर्ण होईल. कोणाला आक्षेप असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येईल.
आरएसएस बैठकीबाबत प्रतिक्रिया
आरएसएसच्या बैठकीबाबत विचारले असता, “आरएसएस काय बोलते, हे सहसा सार्वजनिक होत नाही. त्यांचे विषय अंतर्गतच राहतात,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राम मंदिर हुंडी चोरी प्रकरण
राम मंदिरातील हुंडी चोरीचे प्रकरण गंभीर असून त्याची चौकशी सुरू आहे. तपास योग्य दिशेने व्हावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.





