belgaum

अयोध्या श्रीराम मंदिर हुंडी चोरी धक्कादायक;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीतील पैशांची चोरी ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना असून, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महासचिव मिलिंद परांडे यांनी केली.

सोमवारी बेळगाव शहरातील लक्ष्मी टेकडी येथील हुक्केरी हिरेमठ संस्थानाच्या सभागृहात आयोजित संतांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीचे नेतृत्व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केले होते.

परांडे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील हुंडी चोरीप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटीची स्थापना करून आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

 belgaum

ते पुढे म्हणाले की, या घटनेचा वापर करून काही विरोधक हिंदू समाजाविरोधात षड्यंत्र रचत आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित न राहिलेले काहीजण आता मंदिराबाबत चुकीची विधाने करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

राम मंदिरातील सोने-चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, राम मंदिर ट्रस्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोध करणाऱ्यांनी मंदिरात येऊन वस्तुस्थिती पाहावी, असे आवाहन त्यांनी केले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्याने हिंदूंच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान तीन मुले असावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय सैन्यात हजारो पदे रिक्त होणार आहेत. एका कुटुंबात एकच मूल असेल तर देशाचे संरक्षण कोण करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थ व मद्याच्या व्यसनाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. आगामी जातनिहाय जनगणनेत सर्वांनी ‘हिंदू’ अशी नोंद करावी, यासाठी संत आणि स्वामीजींनी समाजात जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विश्व हिंदू परिषद आणि आरएसएस देशासाठी कार्यरत – स्वामीजी

यावेळी श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी म्हणाले की, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशहितासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मिलिंद परांडे यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषद देशनिर्मितीचे कार्य करत आहे.

आरएसएस किंवा विश्व हिंदू परिषद कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सर्व स्तरातील लोक सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील घटनेमुळे लागलेला कलंक दूर व्हावा, तसेच रामाच्या नावावर झालेल्या अन्यायाचे निराकरण व्हावे, अशी सर्व संतांची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनीही या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. राम मंदिराच्या नावाने हिंदूविरोधी अपप्रचार सुरू असून तो रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नूल सुरगीश्वर मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, कोल्लूर मरडी मठाचे डॉ. पवाडेश्वर शिवाचार्य स्वामी, बाघोजीकोप्प हिरेमठाचे डॉ. शिवलिंग मुरुगराजेंद्र स्वामी, सत्तिगेरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, उपमहापौर हनमंत कोंगाळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.