belgaum

चन्नेवाडीसाठी स्वतंत्र मतदान बूथ व स्वतंत्र वॉर्डची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी गावासाठी स्वतंत्र मतदान केंद्र (बूथ) तसेच कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी मतदार नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण आणि खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर केले.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वी चन्नेवाडी व भुत्तेवाडी येथील मतदारांसाठी चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते. मात्र, नंतर मतदारसंख्येच्या आधारे हे मतदान केंद्र भुत्तेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले.

भुत्तेवाडी येथील मतदान केंद्राबाबत कोणताही आक्षेप नसला तरी चन्नेवाडीतील मतदारांना मतदानासाठी लांब अंतर पार करावे लागत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांची गैरसोय होत असून काही मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. त्यामुळे चन्नेवाडीच्या प्राथमिक शाळेत पुन्हा स्वतंत्र मतदान बूथ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

 belgaum

याशिवाय, कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये चन्नेवाडी आणि भुत्तेवाडी या दोन्ही गावांचा एकच वॉर्ड असून त्यातून तीन ग्रामपंचायत सदस्य निवडले जातात. भुत्तेवाडीची मतदारसंख्या चन्नेवाडीपेक्षा अधिक असल्याने चन्नेवाडीला ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व मिळणे कठीण होत आहे. परिणामी, गावाच्या विकासकामांवरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे चन्नेवाडीसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करून गावाला न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदारांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र मतदान बूथ आणि स्वतंत्र वॉर्ड निर्मितीसाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर शामराव क. पाटील, धनंजय रा. पाटील, रणजीत शा. पाटील, परशराम मा. ऱ्हाटोळकर, मुरलीधर पु. पाटील, रामचंद्र स. ऱ्हाटोळकर, भरमाजी वि. पाटील, महादेव सी. ऱ्हाटोळकर, सुहास क. पाटील, श्रीनाथ वि. पाटील, नागेश व. पाटील, प्रशांत क. पाटील, लक्ष्मण वि. पाटील, विष्णू ल. पाटील, विठ्ठल पु. पाटील, नागोजी क. पाटील, सुधाकर वि. पाटील, सदानंद रा. पाटील, घुराप्पा सु. पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन सादर करतानाही हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.