बेळगाव लाईव्ह : “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ आहे. कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद होय. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी कवितेचा प्रभावी माध्यम म्हणून उपयोग होत आला आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि व्याख्याते डॉ. उमेश कळेकर यांनी केले.
शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास दिनानिमित्त आयोजित ‘कवितेचे वर्म, मर्म आणि धर्म’ या विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शाहिद भगतसिंग सभागृहात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर आणि सचिव सुधाकर गावडे उपस्थित होते.
प्रारंभी कवी परशराम खेमाणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर बसवंत शहापूरकर यांच्या हस्ते डॉ. उमेश कळेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या व्याख्यानात डॉ. कळेकर यांनी कविता लेखनाची प्रक्रिया, कवीची संवेदनशीलता, अनुभवांचे कलात्मक रूपांतर आणि कवितेतील अभिव्यक्तीचे महत्त्व यांचा सखोल उहापोह केला. एखादी भावना कवीला अंतर्मुख आणि अस्वस्थ करते, त्याच भावनेचे शब्दांमध्ये रूपांतर होऊन कविता जन्माला येते, असे त्यांनी सांगितले.
कवीने समाज, निसर्ग आणि आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे कलात्मक, संवेदनशील आणि चिकित्सक नजरेने पाहिले पाहिजे. सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये आणि जीवनातील सूक्ष्म अनुभव यांचे काव्यरूपांतर करण्याची क्षमता प्रत्येक कवीने विकसित केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी स्वतःच्या काही निवडक कवितांचेही सादरीकरण केले. ‘कवितेचा गाव’ या कवितेतून कवितेशी असलेले भावबंध उलगडले, तर ‘पाऊस’ या कवितेच्या दमदार सादरीकरणाने सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. ‘इलेक्शन’ या कवितेद्वारे त्यांनी देशातील राजकीय वास्तवावर मार्मिक भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्य परंपरेचा आढावा घेत शब्दगंध कवी मंडळ संघ गेली अनेक दशके मराठी भाषा, साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्यिक उपक्रमांद्वारे मराठी साहित्याचा वारसा पुढे नेणे ही संघाची बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला डॉ. शिवाजीदादा कागणीकर, प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, प्रा. स्वरूपा इनामदार, रेखा गद्रे, गुरुनाथ किरमटे, चंद्रशेखर गायकवाड, स्मिता किल्लेकर, अस्मिता अळतेकर, नेहा जोशी, मंदाकिनी देसाई, सागर मरगाणाचे यांच्यासह अनेक कवी, साहित्यप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कनबरकर यांनी केले, तर जितेंद्र रेडेकर यांनी आभार मानले.





