belgaum

बेळगाव मॉन्सून अल्ट्रा २०२६ साठी नोंदणी सुरू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव एंड्युरन्स स्पोर्ट्स (BES) तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बेळगाव मॉन्सून अल्ट्रा २०२६’ या ट्रेल रनिंग स्पर्धेच्या चौथ्या पर्वासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा रविवार, २६ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाटातील निसर्गरम्य परिसरात पार पडणार असून, यंदा स्पर्धेसाठी नव्या आंतरराज्यीय मार्गाची निवड करण्यात आली आहे.

यंदाची स्पर्धा केवळ फिटनेसपुरती मर्यादित नसून ‘प्लास्टिकमुक्त समाज’ आणि ‘व्यसनमुक्त युवा’ हा दुहेरी सामाजिक संदेश देत आयोजित करण्यात आली आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी तसेच पश्चिम घाटाचा पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

स्पर्धेची सुरुवात गोजगे (कर्नाटक) येथून होणार असून मार्ग शिनोली (महाराष्ट्र) पर्यंत जाणार आहे. हिरवाईने नटलेला पश्चिम घाट, मुसळधार पाऊस, धुक्याने वेढलेले ट्रेल्स, १,००० मीटरहून अधिक उंचीचा चढ आणि मार्गावरील सुंडी धबधबा हे यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

 belgaum

स्पर्धेचे उद्घाटन उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IGP) संदीप पाटील यांच्या हस्ते होणार असून ते स्वतःही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अनेक वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलेले तसेच आयर्नमॅन कोपनहेगन फिनिशर म्हणून त्यांची ओळख आहे.

यंदा स्पर्धेत ५० किमी, २५ किमी, १३ किमी आणि ७ किमी असे चार गट ठेवण्यात आले आहेत. अनुभवी धावपटूंसह नवशिके आणि कुटुंबांसाठीही स्वतंत्र गटाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत स्पर्धेदरम्यान सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ही ‘कपलेस रेस’ असणार असल्याने प्रत्येक स्पर्धकाने स्वतःची पाण्याची बाटली किंवा हायड्रेशन पॅक सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे. तसेच पश्चिम घाट परिसरात प्लास्टिक किंवा अन्य कचरा टाकणाऱ्या स्पर्धकाला तात्काळ अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना टायमिंग चिप (स्पर्धात्मक गटांसाठी), फिनिशर मेडल, ई-प्रमाणपत्र, मार्गावरील एड स्टेशन सुविधा आणि पौष्टिक नाश्ता देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन (ITRA) मान्यताप्राप्त असून सहभागी धावपटूंना अधिकृत परफॉर्मन्स पॉइंट्सही मिळणार आहेत.

स्पर्धेची नोंदणी २० जुलै २०२६ पर्यंत खुली असून अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी Belagavi Endurance Sports च्या अधिकृत Instagram आणि Facebook पेजला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेचे ठिकाण : शासकीय शाळा, गोजगे, बेळगाव.
संपर्क : रेस डायरेक्टर डॉ. संजीव गुडगणट्टी – ९९८६९८०३८५.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.