बेळगाव लाईव्ह : अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील देणग्यांच्या मोजणीतील कथित अनियमिततेचा विशेष तपास पथक (एसआयटी) आणि पोलिसांकडून सुरू असलेला तपास सत्य समोर आणेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केला. बेळगाव येथे पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुनील आंबेकर म्हणाले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनंतर या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचेल आणि वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असून कोट्यवधी रामभक्तांची मंदिरावरील श्रद्धा आणि विश्वास अबाधित राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत राम मंदिर प्रकरणासह अनेक राष्ट्रीय आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा झाली. आगामी जनगणना, लोकसंख्याशास्त्रीय असंतुलन, अमली पदार्थांचे वाढते संकट आणि व्यसनमुक्ती अभियान यावरही सविस्तर विचारमंथन करण्यात आले. तसेच संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही चर्चा झाली.
बैठकीत मार्च २०२६ नंतर संघाने देशभरात राबविलेल्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यंदा ८३ संघ शिक्षा वर्ग आणि १२ कार्यकर्ता विकास वर्ग आयोजित करण्यात आले असून, त्यामध्ये १८,८४२ स्वयंसेवकांना शाखा व्यवस्थापन, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आंबेकर यांनी दिली.

याशिवाय सप्टेंबर महिन्यात संघाच्या शाखा विस्तार मोहिमेला गती देण्याचा निर्णय, शताब्दी वर्षातील कार्यक्रमांचा आढावा, ‘पंच परिवर्तन’ अभियानाचा विस्तार आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या २०२६–२७ मधील देशव्यापी दौऱ्याच्या नियोजनावरही चर्चा झाली.
बेळगाव येथे झालेल्या या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह देशभरातील २२६ संघ पदाधिकारी उपस्थित होते.





