बेळगाव लाईव्ह: तिलारी पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला राकासकोप जलाशय अखेर तुडुंब भरला असून, जलाशय आता ओसंडून वाहण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईच्या छायेत असलेल्या बेळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मंगळवारपर्यंत जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघे दोन फूट पाणी कमी होते. मात्र, मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत तिलारी पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे अल्पावधीतच जलाशय पूर्ण क्षमतेने भरला.
सध्या जलाशयाच्या दरवाज्यांची देखभाल व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दरवाजे एक ते दोन इंचांनी उघडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया नियमित देखभाल आणि सुरक्षित पाणी व्यवस्थापनाचा भाग असल्याची माहिती जलाशय परिसरातून रिपोर्टर रामलिंग पाटील (तुडिये) यांनी दिली.
राकसकोप जलाशय हा बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार आहे. त्यामुळे जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता आता पूर्णपणे दूर झाली आहे. आगामी काळात नागरिकांना मुबलक आणि नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या घटत्या साठ्यामुळे प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागत होते. मात्र, यंदाच्या दमदार पावसामुळे जलाशयात समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने बेळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसही परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, जलाशयातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





