belgaum

गणेश मूर्तीशाळांमध्ये पोलीस आयुक्तांची पाहणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत आणि मिरवणूक कमी वेळेत, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, या उद्देशाने बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी उत्सवाला तब्बल दीड महिना शिल्लक असतानाच तयारीला सुरुवात केली आहे. मंगळवारी (२८ जुलै) सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत त्यांनी शहरातील विविध गणेश मूर्तीशाळांना भेट देऊन पाहणी केली आणि मूर्तिकारांशी संवाद साधत आवश्यक मार्गदर्शन केले.

या दौऱ्यात मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.

 belgaum

विविध मूर्तीशाळांना भेट

पोलीस आयुक्तांनी यदुराप्पा रोड येथील मनोहर पाटील, अनगोळ येथील जे. जे. पाटील, विक्रम व विनायक, मुतगा येथील एम. जी. पाटील तसेच गुडशेड रोडवरील कुंभार ब्रदर्स यांच्या मूर्तीशाळांसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या पाहणीदरम्यान सुमारे १०० हून अधिक गणेशमूर्तींची पाहणी करण्यात आली. मूर्तिकार संघटनेचे सचिव विनायक मनोहर पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे वृक्षरोप देऊन स्वागत केले.

तांत्रिक अडचणी टाळण्यावर भर

मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी पोलीस आयुक्त बोरसे हे पहिल्या मूर्तीच्या आगमनापासून शेवटच्या मूर्तीच्या विसर्जनापर्यंत कपिलेश्वर तलाव परिसरात उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. त्यामुळे त्या ठिकाणच्या सर्व अडचणींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर यंदा अशा अडचणी पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी त्यांनी मूर्तिकारांना विसर्जनासाठी अनुकूल रचना, उंची व इतर तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले. तसेच कोणतीही अडचण असल्यास थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले.

प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन

या विशेष पाहणी मोहिमेत मार्केट, खडेबाजार, शहापूर, मारीहाळ आणि उद्यमबाग पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या या सकारात्मक पुढाकाराचे सर्व मूर्तिकारांनी स्वागत करत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यामुळे यंदाची बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि कमी वेळेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.