बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी मलप्रभा डाव्या कालव्यात तातडीने 2 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी विविध स्थानिक प्रश्नांवरही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे की, मलप्रभा डाव्या कालव्याच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांसह जनावरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन मलप्रभा डाव्या कालव्यात 2 टीएमसी पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी करण्यात आली.
पिण्याच्या पाण्याअभावी अनेक गावांतील नागरिक आणि पशुधन त्रस्त असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी विविध स्थानिक समस्यांवर चर्चा केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.





