बेळगाव लाईव्ह : पश्चिम घाटासह कोकण किनारपट्टीच्या भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात बेळगाव जिल्ह्यातही वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी सायंकाळपासून शहरात पावसाची केवळ रिमझिम सुरू झाली होती, तर सोमवारी सकाळच्या सत्रात पावसाने बऱ्यापैकी जोर धरला होता. त्यानंतरचे दोन दिवस संपूर्ण बेळगावात केवळ ढगाळ वातावरण राहून पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. मात्र, बुधवारपासून पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण बेळगावकर तीव्र पाणीटंचाईचा सामना करत होते, अगदी जलाशयांच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. मात्र, बुधवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते. काही भागांत कशाबशा पेरण्या झाल्या होत्या, परंतु पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट घोंघावू लागले होते. आता पावसाने चांगलाच जोर पकडल्याने शेतीकामांना गती आली असून, बेळगाव तालुक्यात शेतकरी खरीप हंगामाच्या कामांत पूर्णपणे व्यस्त झाले आहेत.

फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या असह्य उन्हाच्या झळा आणि उकाड्याने बेळगावकर पुरते हैराण झाले होते. मध्यंतरी वळीव पावसाने हजेरी लावली, तरीही उन्हाचा तडाखा कमी झाला नव्हता.
मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या या मुसळधार पावसामुळे ‘गरिबांचे महाबळेश्वर’ अशी ओळख असलेल्या बेळगावचे तापमान कमालीचे घसरले असून, सर्वत्र आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, घाटमाथा आणि वनपरिक्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या गावात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने सर्व पूर्वतयारी केली आहे.




