बेळगाव लाईव्ह : समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या स्मशानभूमी कर्मचारी, शववाहिनी कर्मचारी आणि शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा शांताई वृद्धाश्रम, चंदन कमल केअर सेंटर आणि विकी मेहता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष समारंभात गौरव करण्यात आला.
बेळगाव शहरातील पै रिसॉर्ट येथे माजी महापौर विजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. माधव प्रभू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. जी. गडाद, मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार, दिनेश वर्णेकर, श्रीपाद पै आणि विजय कोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात दिवस-रात्र, अनेकदा कठीण आणि भावनिक परिस्थितीतही समाजसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सेवाभावाचे कौतुक करत, अशा कर्मचाऱ्यांच्या कार्याची समाजाने अधिक दखल घेण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी महापौर विजय मोरे म्हणाले, “स्मशानभूमी, शववाहिनी आणि शवविच्छेदन विभागातील कर्मचारी हे समाजातील खरे ‘अनामिक नायक’ आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या कार्याला योग्य सन्मान आणि सातत्याने प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.”
सत्कार समारंभानंतर सन्मानित कर्मचारी व उपस्थित मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, गंगाधर पाटील, मायकल पिंटो, सूरज गवळी यांच्यासह अनेक स्वयंसेवक, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजासाठी निष्ठा, संवेदनशीलता आणि करुणेने सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




