belgaum

बेळगाव शहरातील विविध समस्यांवर काय म्हणाले माजी महापौर…?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाई आणि मतदार सर्वेक्षणासाठी मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत. राकसकोप आणि हिडकल धरणांतील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.


यंदा कमी झालेल्या पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. दुसरीकडे हिडकल धरणातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत असल्याने शहरासह परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. पावसाळ्यातच अशी परिस्थिती असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.


प्रशासनाने या संकटावर मात करण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली आहे, याची माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हिडकल धरणातील पाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणात न सोडता पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने राखून ठेवले असते, तर शहराला पुढील वर्षभर पुरेल इतका साठा उपलब्ध राहिला असता, असे त्यांनी नमूद केले. जलसंपदा विभागाशी समन्वय साधून पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

 belgaum


यावेळी त्यांनी मतदार सर्वेक्षणातील भाषेचाही मुद्दा उपस्थित केला. सध्या सुरू असलेल्या विशेष मतदार सर्वेक्षणासाठी केवळ कन्नड भाषेतील अर्ज उपलब्ध असल्याने मराठी भाषिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे अर्ज तातडीने मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.


या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडे यापूर्वीच लेखी निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आयुक्तांनीही राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले असून, पुढील चार ते आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र पाठपुरावा करण्यात येईल, असा इशारा माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.