बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील नंदगड येथे नंदगड-बिडी मार्गावर संगोळी रायान्ना चौकाजवळ शुक्रवारी (३ जुलै) दुपारच्या सुमारास एका मोठ्या झाडाची फांदी अचानक रस्त्यावर कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दोन दुचाकीस्वार फांदीच्या विळख्यात सापडण्याच्या स्थितीत आले. त्यापैकी एकाने प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला उडी मारल्याने त्याचा जीव वाचला, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदगड पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या व्हन्नवा देवी सोसायटी इमारतीसमोर ही घटना घडली. त्यावेळी तेथून एक टीव्हीएस एक्सल आणि एक सीडी-100 दुचाकी जात होती. अचानक झाडाची मोठी फांदी रस्त्यावर कोसळू लागल्याचे पाहताच सीडी-100 चालकाने तत्काळ दुचाकी सोडून बाजूला धाव घेतल्याने तो थोडक्यात बचावला.
मात्र, टीव्हीएस एक्सलवरील दुचाकीस्वार फांद्यांमध्ये अडकून किरकोळ जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याची सुटका करून नंदगड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मोठी फांदी रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्याने नंदगड-बिडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी फांदी हटवून वाहतूक पूर्ववत केली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.




