बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारच्या ‘पीएम-ईबस सेवा’ योजनेअंतर्गत बेळगावमधील ‘डेपो क्रमांक 2’ येथे नवीन इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) डेपोच्या उभारणीसाठी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाने (एनडब्ल्यूकेआरटीसी) 10.24 कोटी रुपयांची निविदा जाहीर केल्यामुळे बेळगावमध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
सदर प्रकल्पाचा अंदाजित खर्च 10.24 कोटी रुपये असून पावसाळ्याचा कालावधी वगळता हे काम पूर्ण करण्यासाठी 9 महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निविदेमध्ये इलेक्ट्रिक बसेसच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधांनी सज्ज अशा आधुनिक डेपोच्या विकासाचा समावेश आहे.
कामाच्या व्याप्तीमध्ये दुमजली प्रशासकीय इमारत, वर्कशॉप आणि स्टोअर इमारत, काँक्रीटचे पार्किंग आणि वाहनांच्या हालचालीसाठीचे क्षेत्र (सर्क्युलेशन एरिया), कंपाऊंड आणि संरक्षक भिंती, ड्रेनेज नेटवर्क, सेप्टिक टँक, भूमिगत व ओव्हरहेड पाण्याच्या टाक्या, सुरक्षा केबिन, अग्निशमन यंत्रणा, हाय-मास्ट लाइटिंग, विद्युत कामे, तसेच रस्त्यावरील मार्किंग आणि फलक बसवणे यांचा समावेश आहे.
तसेच नवीन सुविधेसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सध्याच्या प्रशासकीय इमारती आणि दुरुस्तीसाठीच्या जागा (रिपेअर बेज) पाडण्याचे कामही यात समाविष्ट आहे. ‘पीएम-ईबस सेवा’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याच्या या प्रकल्पांतर्गत वर्कशॉप आणि स्टोअर इमारत (2.83 कोटी रुपये), पार्किंग आणि वाहनांच्या हालचालीचे क्षेत्र (2.28 कोटी रुपये) आणि प्रशासकीय इमारत (1.90 कोटी रुपये) हे सर्वात मोठे घटक आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटक परिवहन विभागाने ‘पीएम-ईबस सेवा’ योजनेअंतर्गत 10 शहरांमधील इलेक्ट्रिक बसच्या पायाभूत सुविधांसाठी 25.83 कोटी रुपयांना मंजुरी दिली होती. या निधीमध्ये केंद्र सरकारचा 14.96 कोटी रुपये आणि राज्य सरकारचा 10.87 कोटी रुपयांचा वाटा समाविष्ट आहे. डेपोचे आधुनिकीकरण आणि संबंधित पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी या पॅकेजअंतर्गत बेळगावला 2.95 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
ज्यामध्ये केंद्राचा 1.71 कोटी रुपये आणि राज्य सरकारचा 1.24 कोटी रुपयांचा वाटा आहे. ‘पीएम-ईबस सेवा’ योजनेअंतर्गत केंद्राने बेळगावसाठी आधीच 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत. शाश्वत शहरी वाहतुकीला चालना देण्यासाठी देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये 10,000 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस तैनात करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. डेपोसाठी निविदा (टेंडर) काढणे ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे, कारण शहरातील सार्वजनिक वाहतूक ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यापूर्वी चार्जिंग, पार्किंग आणि देखभालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही पूर्वअट आहे.
बेळगाव येथील डेपो क्र. 2 मधील ईव्ही डेपो या नवीन ताफ्यासाठी ‘कार्यकारी केंद्र’ (ऑपरेशनल हब) म्हणून काम करेल. या ठिकाणी बस पार्किंग, चार्जिंग, देखभाल आणि प्रशासकीय कामकाजाच्या सुविधा असतील. शहरात अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.




