बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाशेजारील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रोड रस्त्याची दुरावस्था झाली असून तो तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करावा, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी एका निवेदनाद्वारे महानगरपालिका आयुक्तांना केली आहे
सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त विनंतीचे निवेदन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांना सादर केले. आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर खराब झालेला रस्ता दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन दिले. बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रोड खाचखळगे पडून अतिशय खराब झाला आहे.
याबाबत रितसर तक्रार करून जवळपास 25 दिवस उलटून गेले असून संबंधित विभागाच्या सेक्शन ऑफिसरनी जागेची पाहणी करून रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल, असे केवळ आश्वासन दिले आहे. कारण त्यानंतर पाहणी अथवा दुरुस्ती वगैरे पुढील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी या पद्धतीने धोकादायक बनलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
मानवतावादी दृष्टिकोनातून आपण स्वतः या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच दररोज प्रवास करणारे नागरिक कोणत्या हालअपेष्टा सहन करत आहेत, हे जाणून घ्यावे ही नम्र विनंती आहे.
विशेषतः एल अँड टी कंपनीने केलेल्या कामानंतर हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या अत्यंत खराब स्थितीमुळे अनेक प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना किरकोळ अपघात होऊन दुखापती झाल्या आहेत. दररोज या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना शारीरिक त्रास, पाठदुखी व इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांतील चिखलमिश्रित पाणी आजच्या यांच्या अंगावर, मुलांच्या शालेय गणवेशावर कुठून त्यांची गैरसोय होत आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण होत आहे. या खराब रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून उन्हाळ्यात धुळीचे प्रदूषण वाढते. तसेच वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरून वाहणारे पावसाचे पाणी थेट या रस्त्यावर येत असल्यामुळे दरवर्षी रस्त्याचे अधिक नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबरोबरच डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना योग्य जलनिस्सारण गटारी बांधण्यात याव्यात, जेणेकरून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होऊन भविष्यात रस्त्याचे नुकसान टाळता येईल.

सध्या पावसाळा सुरू झालेला असल्याने कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजने म्हणून रस्त्यावर स्टोन डस्ट किंवा वेट मिक्स टाकून रोड रोलरद्वारे समतल करण्यात यावे. मात्र हा केवळ तात्पुरता उपाय असून कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, डेक्कन हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, शालेय विद्यार्थी तसेच या महत्त्वाच्या रस्त्याचा वापर करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
ही बाब अत्यंत तातडीची व जनहिताची असल्याने महानगरपालिकेने तिची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व सोयीच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या पाहणीची, कायमस्वरूपी दुरुस्तीची व जलनिस्सारणाच्या कामांची संभाव्य कालमर्यादा आम्हाला लेखी स्वरूपात कळवावी, ही नम्र विनंती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण होईल आणि या विषयावर तातडीने कार्यवाही होत असल्याची खात्री मिळेल, असा तपशील सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्या निवेदनात नमूद आहे.




