belgaum

हिंदीच्या नव्या पाठ्यक्रमावर कार्यशाळा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालय, एम.कॉम. व एम.एस्सी. स्नातकोत्तर केंद्र, तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विषयाच्या नव्या पाठ्यक्रमासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला विविध पदवी महाविद्यालयांतील हिंदी प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. सुरेखा कामुले होत्या, तर प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून आर.पी.डी. महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र पोवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दीपा अंटीन यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.

राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मुल्ला यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

 belgaum

मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. राजेंद्र पोवार यांनी हिंदी विषयाच्या नव्या पाठ्यक्रमाची रचना, उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, मूल्यमापन प्रक्रिया आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

अध्यक्षीय भाषणात प्रा. सुरेखा कामुले यांनी अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यशाळा शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीसह अध्यापनाच्या गुणवत्तावाढीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. महाविद्यालय आणि हिंदी प्राध्यापक संघाच्या संयुक्त उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी हिंदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवृत्त प्राध्यापक डॉ. जी. पी. साळे, प्राचार्यपदी पदोन्नती झाल्याबद्दल डॉ. एस. ए. जहागीरदार, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. कोमल जवळकर, शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल डॉ. दीपा अंटीन तसेच प्रा. तेजस्विनी अक्कोळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. जी. पी. साळे आणि डॉ. एस. ए. जहागीरदार यांनी शिक्षकांनी सातत्याने अध्ययन, संशोधन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर द्यावा, असे आवाहन केले.

या कार्यशाळेला बी.ओ.ई. चेअरमन प्रा. एम. ए. पिरों यांच्यासह विविध महाविद्यालयांतील हिंदी विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण शैक्षणिक, विचारमंथनात्मक आणि प्रेरणादायी होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राणी चन्नम्मा विद्यापीठ हिंदी प्राध्यापक संघाच्या सचिव डॉ. प्रेमा गाडवी यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, आयोजक आणि सहभागी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.