बेळगाव लाईव्ह : पिरनवाडी येथील सोन्याच्या दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 4 लाख 78 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणी गोवा राज्यातील 18 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
3 मे 2026 रोजी शास्त्रीनगर येथील वृषभ रामचंद्र शिरोडकर यांनी पिरनवाडीतील कामाक्षी ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीबाबत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 113/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), उपपोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली.
तपासादरम्यान विनायक उर्फ चिराग प्रकाश पाटील (वय 18, रा. साखळी, उत्तर गोवा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदारांसह पिरनवाडीतील कामाक्षी ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तसेच बागलकोट जिल्ह्यातील नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दागिने चोरी आणि मरिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलजीजवळील साखळी चोरीतही सहभाग असल्याची कबुली दिली.

आरोपीकडून 4 लाख 78 हजार रुपये किमतीचे 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर, पीएसआय संतोष दळवायी, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि तांत्रिक विभागाच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.




