belgaum

कै. पांडुरंग हेब्बाळकर स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : तिवोली– भाजपाचे युवा नेते किशोर हेब्बाळकर यांचे वडील तथा तिवोली येथील ज्येष्ठ समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. पांडुरंग शांताराम हेब्बाळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे बंधू व शिक्षक महेश गो. हेब्बाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या जीवनप्रवासाला उजाळा दिला आहे.

४ जुलै २०२५ रोजी कै. पांडुरंग हेब्बाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ हेब्बाळकर कुटुंबानेच नव्हे, तर तिवोली, गुंजी आणि परिसरातील असंख्य नागरिकांनी आपला विश्वासू, मदतीला धावून जाणारा आणि माणुसकी जपणारा आधारवड गमावला.

“चंदनापरी देह झिजविला… कष्टातून संसार फुलविला… वटवृक्ष गेला कोसळून, सावली गेली हरवून…” या ओळींमधून महेश हेब्बाळकर यांनी आपल्या भावनांना शब्द दिले आहेत.

 belgaum

१० मार्च १९७० रोजी तिवोली येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावात, माध्यमिक शिक्षण गुंजी येथे आणि पदवी शिक्षण बेळगाव येथील गोगटे महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात काम केले. मात्र गावाशी असलेली नाळ कायम जपण्यासाठी त्यांनी पुन्हा आपल्या मातीत परतण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचा दुग्ध व्यवसाय सांभाळताना त्यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांशी आत्मीयतेचे संबंध निर्माण केले. गुंजी परिसरात ते प्रेमाने “पांडू गवळी” म्हणून ओळखले जात होते. २००३ मध्ये त्यांनी एलआयसीचे विमा प्रतिनिधी म्हणून काम सुरू केले. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि लोकांशी जपलेले आत्मीय नाते यामुळे त्यांनी विमा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.

२००६ पासून त्यांनी सातत्याने शतकवीर विमा प्रतिनिधी हा बहुमान मिळवला, तर तीन वेळा एमडीआरटी (MDRT) प्रतिनिधी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली. लोकांचा विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती होती.

समाजकार्यातही ते तितकेच सक्रिय होते. २००७ मध्ये तिवोली ग्रामदैवत लक्ष्मी यात्रेच्या समितीचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. गावातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेत असत. त्यांचा साधेपणा, मनमिळावू स्वभाव आणि कोणालाही न दुखावणारे व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले.

कुटुंबासाठी आयुष्यभर त्यांनी अथक परिश्रम घेतले. मुलांना उच्च शिक्षण दिले, संसार उभा केला; मात्र स्वतःची अनेक स्वप्ने अपूर्णच राहिली. आज त्यांच्या आठवणींनी कुटुंबीय आणि मित्रपरिवार भावूक होत आहे.

प्रथम स्मृतिदिनानिमित्त भावना व्यक्त करताना महेश गो. हेब्बाळकर म्हणाले, “भाऊ, तुझ्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. पण तू दिलेले संस्कार, प्रामाणिकपणा, कष्टाची शिकवण आणि माणुसकीचा वारसा आम्ही जपत राहू. हीच तुझ्या पवित्र स्मृतीस आमची विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली.”

कर्तृत्व, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम असलेल्या कै. पांडुरंग हेब्बाळकर यांच्या स्मृती आजही अनेकांच्या मनात तेवढ्याच जिवंत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, हीच त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.