belgaum

खानापूर तालुक्यातील धबधब्यांवर पर्यटकांना बंदी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पश्चिम घाट परिसरात तसेच खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धबधबे, नाले आणि जंगल परिसर धोकादायक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पश्चिम घाटातील धबधबे व जंगल परिसरात पर्यटकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.


बेळगावचे उपअरण्यसंरक्षणाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, पाण्याची पातळी अचानक वाढणे, घसरडे रस्ते आणि जंगलातील वाढता धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


प्रसिद्धीपत्रकात नागरिक आणि पर्यटकांनी बंदी आदेशाचे काटेकोर पालन करावे, धबधबे व जंगल परिसरात जाण्याचे टाळावे आणि वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, बंदी आदेशाचे उल्लंघन करून धबधबे किंवा जंगल परिसरात प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध वन कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 belgaum

खानापूर तालुका हा पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पट्ट्यात असून येथे अनेक प्रसिद्ध धबधबे आणि पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये सुरला धबधबा, वज्रपोहा (जांबोटी) धबधबा, कणकुंबी परिसरातील धबधबे, भीमगड अभयारण्यातील नैसर्गिक धबधबे यांचा समावेश होतो. पावसाळ्यात या धबधब्यांचे सौंदर्य खुलून येत असल्याने दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

याशिवाय भीमगड वन्यजीव अभयारण्य, कणकुंबी, जांबोटी, सुरला घाट, , तिलारी बॅकवॉटर, महादाई (म्हादई) नदीचा परिसर ही खानापूर तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील नद्या, ओढे आणि धबधबे धोकादायक बनले असून वन विभागाने पर्यटकांनी या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.