बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक अखेर बुधवार, ८ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी ३० जून रोजी होणारी बैठक मुख्यमंत्री यांच्या अनुपस्थितीमुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विरोधकांनी विधिमंडळात हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केल्यानंतर सरकारने लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ही बैठक ८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडणार आहे. बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे नेते तसेच उच्चाधिकार समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
३० जूनची बैठक रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे अनिल परब यांनी विधिमंडळात सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारवर टीका करत बैठक तातडीने घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने नव्याने तारीख निश्चित केली आहे.

या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भातील न्यायालयीन लढा, सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांचे प्रश्न, प्रशासकीय घडामोडी, विविध विकासकामे तसेच पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. सीमाप्रश्नाशी संबंधित प्रलंबित विषयांवर महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बैठकीनंतर पुढील दिशा निश्चित होणार असल्याने सीमाभागातील नागरिकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.




