belgaum

“वाचन केले तरच वाचाल” : विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असून, सातत्यपूर्ण वाचनामुळे जीवन अधिक समृद्ध, सकस आणि यशस्वी बनते. उदात्त ध्येये गाठायची असतील तर चांगल्या पुस्तकांशी मैत्री करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.

जायंट्स सखीच्या वतीने महिला विद्यालय, बेळगाव येथे आयोजित “वाचाल तर वाचाल” या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर होत्या. व्यासपीठावर विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अपर्णा पाटील तसेच महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

 belgaum

प्रा. पाटील म्हणाले, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले असून पुस्तक वाचनाची सवय कमी होत चालली आहे. घरातील पुस्तके धूळ खात पडली आहेत, तर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकही मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यामुळे समाजात पुन्हा वाचन संस्कृती रुजविण्याची गरज निर्माण झाली आहे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुधा मूर्ती आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या जीवनातील उदाहरणांचा उल्लेख करत त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. सातत्याने वाचन करणाऱ्या व्यक्तींमध्ये विचारशक्ती, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता अधिक विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी, “भविष्यात तुम्ही वाचन केले तरच वाचाल,” असा संदेश देत दररोज चांगल्या पुस्तकांचे वाचन करण्याची सवय लावण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी जायंट्स सखीतर्फे सातत्याने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील यांनीही विद्यार्थिनींनी वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच जायंट्स सखीच्या माजी अध्यक्षा शीतल पाटील, उपाध्यक्षा राजश्री हसबे, स्वाती फडके, अर्चना कंग्राळकर, वैशाली भातकांडे, वरदा अंगडी, सुवर्णा काळे, सुलोचना कुट्रे, शीतल नेसरीकर, नीलिमा करंजीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपा पाटील यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.