belgaum

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचा संताप…

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह / दिल्ली (विशेष प्रतिनिधी): नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि तरुणांचा मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. देशभरातून आलेली तरुणाई या आंदोलनात मोठ्या संख्येने एकवटली असून, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

या आंदोलनाची थेट माहिती आणि देशातील या महत्त्वाच्या घडामोडींचे ग्राउंड वास्तव बेळगावसह परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी ‘बेळगाव लाईव्ह’ची टीम थेट दिल्लीतील जंतर-मंतरवर दाखल झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद प्रभू यांनी या संपूर्ण आंदोलनाचा विशेष आढावा घेतला आहे.

आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीने प्रशासकीय आणि वैद्यकीय व्यवस्थेवर तीव्र ताशेरे ओढले. “नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर लीक होणे किंवा घोटाळा होणे ही साधी गोष्ट नाही. याच परीक्षांमधून आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवणारे डॉक्टर घडतात. जर अकार्यक्षम किंवा चुकीच्या पद्धतीने लोक या व्यवस्थेत आले, तर नागरिकांच्या आरोग्याचे काय होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल नेहा नावाच्या विद्यार्थिनीने उपस्थित केला.

 belgaum

तसेच, पोलीस, न्यायालय आणि रुग्णालय व्यवस्थेतील त्रुटींमुळे झालेल्या वैयक्तिक त्रासाचा पाढा वाचत, या अन्यायाविरुद्ध तरुण पिढी आता शांत बसणार नाही, असा इशाराही तिने दिला.

जंतर-मंतरवर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून आंदोलकांना रोखण्याचा आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून इशारा आणि अडवणूक केली जात असली, तरीही आंदोलक विद्यार्थी मागे हटण्यास तयार नाहीत. ‘परिवर्तनकारी छात्र संघटन (प्रयास)’ सह विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी हातात फलक घेऊन आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी विविध राजकीय नेत्यांचीही उपस्थिती पाहायला मिळत असून, येथील परिस्थिती ‘बेळगाव लाईव्ह’ टीम जवळून पाहत आहे…

यासंदर्भात काही वेळातच आम्ही फेसबुक इंस्टाग्राम आणि youtube या तिन्ही फॉरमॅटवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो आवर्जून पाहावा

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.