बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमधील मतदार याद्या अद्ययावत व दोषमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ४१.०७ लाख मतदारांपर्यंत पोहोचून १०० टक्के अर्ज वाटपाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
मतदार यादीतील नाव, पत्ता आणि मतदान केंद्राची शहानिशा करण्यासाठी बूथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. जे मतदार भेटीदरम्यान उपलब्ध झाले नाहीत, त्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे ‘बीएलओ सुविधा केंद्र’ म्हणून कार्यरत करण्यात आली आहेत.
सध्या जिल्ह्यात एकूण ७६ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, बेळगाव दक्षिण मतदारसंघात ६० टक्के आणि बेळगाव उत्तर मतदारसंघात ५१ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे.
या मोहिमेदरम्यान अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची पडताळणी केली जात असून ही माहिती सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सामायिक करण्यात आली आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे किंवा त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र नागरिकांनी आपल्या नोंदी तपासून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.





