belgaum

मनपाच्या जन्म-मृत्यू दाखला विभागात एजंटांचा सुळसुळाट?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागात दाखले मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची होणारी अडवणूक पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. प्रशासनाकडून डिजिटल आणि पारदर्शक कारभाराचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना साध्या दाखल्यासाठीही वारंवार महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. दुसरीकडे, याच कामासाठी दलालांची मदत घेतल्यास अवघ्या दोन दिवसांत दाखले हाती पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यावर लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या इ-जन्म नोंदणी विभागात अर्ज सादर केल्यानंतर २० ते २५ दिवस उलटले तरी नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. बाळेकुंद्री, सांबरा यांसारख्या ग्रामीण भागातून येणारे नागरिक आणि ८२ वर्षांच्या वृद्धांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. सर्व वैद्यकीय कागदपत्रे वेळेत जमा करूनही ‘ना उद्या या, ना परवा या’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांना परत पाठवले जात असल्याचा आरोप यावेळी दाखले मिळविण्यासाठी आलेल्या अर्जदार नागरिकांनी केला.

कामाचा खोळंबा करून दूरवरून येणाऱ्या नागरिकांना महिनाभर हेलपाटे मारूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने कोणतीही माहिती मिळत नसून, मध्यस्थांमार्फत जाणाऱ्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

 belgaum

वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसून दररोज नवीन कारणे सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होताच, नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत तात्काळ नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी मनपाच्या संबंधित विभागाला भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली ससेहोलपट लक्षात घेता याठिकाणी एजंटराज कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठीही नागरिकांना कोर्टाचे फेरे मारायला लावणे आणि दुसरीकडे दलालांमार्फत आलेल्या अर्जांची दोन दिवसांत विल्हेवाट लावणे, हा प्रकार प्रशासनातील गंभीर गैरप्रकार दर्शवतो. सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि दलालांसाठी वेगळा नियम चालणार नाही, असा इशारा देत या दलालशाहीला आळा घालण्यासाठी आणि डिजिटल प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत यासाठी लवकरच महापौरांसोबत बैठक घेऊन कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.