बेळगाव लाईव्ह : कर्ज फेडले तरीही अतिरिक्त वसुलीचा तगादा लावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सावकाराला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सदानंद भीमराव हलगे (वय ४७, रा. भीम नगर, संकेश्वर, ता. हुक्केरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहा विकास मेलगे (रा. करजगी, ता. हुक्केरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या पतीने आरोपी सदानंद याच्याकडून २०२२ ते २०२६ या काळात व्याजाने कर्ज घेतले होते. कर्ज देताना आरोपीने चार कोरे धनादेश आणि वाढीव रक्कम नमूद करून बाँड लिहून घेतले होते.
पीडित दाम्पत्याने १६ लाख १६ हजार ५८० रुपयांच्या कर्जापोटी मुद्दल आणि व्याज मिळून तब्बल ३६ लाख ७७ हजार ६०७ रुपये ऑनलाईन आणि आरटीजीएसद्वारे परत केले होते. तरीही आरोपीने आणखी ४ लाख ६४ हजार रुपयांची मागणी करत, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी बीएनएस कायद्यातील संबंधित कलमे आणि ‘द कर्नाटक मायक्रो अँड स्मॉल लोन’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपती बी. कोंगनोळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी सदानंद कणगला गावातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ही यशस्वी कारवाई करणारे पोलीस निरीक्षक जी. बी. कोंगनोळी, पीएसआय व्ही. आय. नाईक, यु. एस. शेट्टेन्नावर, एएसआय एल. एस. खोत आणि तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.





