बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांत वाढत्या प्रदूषणामुळे सणाचा मूळ उद्देश मागे पडून निसर्गाची हानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक, निसर्गस्नेही आणि प्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचा निर्धार बेळगावात करण्यात आला आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांनी पुढाकार घेतला असून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींना पूर्णपणे फाटा देत फक्त शाडूच्या मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात केवळ शाडूच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे गेल्या सात वर्षांपासून हे हरित अभियान राबवले जात आहे. रोटरी क्लबचे अधिकारी सुधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही नागरिकांनी रासायनिक रंगांच्या आणि पीओपीच्या मूर्ती टाळून शाडूच्या मूर्तींनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे जलस्रोत प्रदूषित होतात आणि विसर्जन प्रक्रियेत मूर्तींची विटंबना होते. ही विटंबना रोखण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठीच ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात आल्याचे क्लबचे माजी अध्यक्ष इरफान शेख यांनी सांगितले आहे.

नागरिकांना शाडूच्या मूर्ती सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी रोटरी क्लबतर्फे शहरातील दहा प्रमुख ठिकाणांवर बुकिंग आणि वितरणाची सोय करण्यात आली आहे. बामणे टॉवर्स गोवा वेस, कुमारस्वामी लेआउट, भाग्यनगर, किर्लोस्कर रोड, वडगाव, खासबाग सर्कल, शिवबसवनगर, टिळकवाडी, हिंडलगा आणि मंडोळी रोड या केंद्रांवरून या मूर्तींचे वितरण केले जाणार आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेशोत्सव निसर्गस्नेही करण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





