belgaum

SIR मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी; DC कडून BLOंचा गौरव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना (BLO) प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवत शहापूर येथील बसवान गल्लीमध्ये जाऊन BLO सतीश ढवळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बेळगाव महापालिकेतील २५७ BLOंपैकी सर्वप्रथम १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हा सन्मान ठरला.

कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या बैठकीत SIR मोहिमेत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या BLO यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले होते. त्यानुसार बेळगाव दक्षिण मतदारसंघातील सर्वप्रथम काम पूर्ण करणारे BLO सतीश ढवळे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एस. जी. कावळे यांच्यासह अन्य BLOंच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.

निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा उत्साह वाढला असून, BLO अधिक जोमाने काम करत आहेत. सध्या जिल्ह्यात SIR मोहिमेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात ६३ टक्के प्रगती झाली असून, आतापर्यंत १ लाख ६० हजार मतदारांची माहिती डिजिटायझेशन करण्यात आली आहे. उर्वरित सुमारे ७० हजार मतदारांची प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 belgaum

नागरिकांना आवाहन करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, BLO यांनी दिलेले फॉर्म वेळेत परत करावेत. फॉर्म भरता येत नसल्यास तो रिकामा परत दिला तरी BLO आवश्यक माहिती भरून डिजिटायझेशन करतील. मात्र फॉर्म जमा न केल्यास मतदार यादीतील नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

SIR मोहिमेत कोणावरही दबाव टाकण्यात आलेला नसून, कोणालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली नाही. परस्पर सहकार्य, विश्वास आणि सकारात्मक वातावरणात ही मोहीम राबवली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पूनम बाबळे, एस. जी. कावळे तसेच महिला BLO यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. मुसळधार पाऊस, विविध मतदान केंद्रांमध्ये नोंद असलेले कुटुंबीय आणि इतर अडचणी असूनही त्यांनी कर्तव्यनिष्ठेने काम पूर्ण केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, वरिष्ठ अधिकारी अनबू कुमार यांनी वडगाव येथे BLO यांच्याशी संवाद साधून त्यांच्या नियोजनबद्ध आणि पारदर्शक कामकाजाचे कौतुक केले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील SIR मोहिमेची अंमलबजावणी शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.