बेळगाव लाईव्ह: बळ्ळारीनाल्याला मोठा पूर आल्यास नाल्यातील जलपर्णी, गाळ आणि शहरातील कचरा थेट शेतजमिनीत जाऊन हजारो एकर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा शेतकरी नेते राजू मर्वे यांनी दिला आहे. दरवर्षी पूरस्थितीमुळे नाल्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, यंदाही तीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शहापूर, वडगाव, अनगोळ, माधवपूर, जुने बेळगाव, हालगा आणि परिसरातील शेतकरी दरवर्षी बळ्ळारीनाल्याच्या पुराचा फटका सहन करत आहेत. खरिप हंगामात एकरी हजारो रुपये खर्च करून पेरणी केली जाते. मात्र, दोन ते तीन वेळा येणाऱ्या पुरामुळे उभी पिके वाहून जातात किंवा पाण्याखाली जातात. त्यामुळे खरिपासोबतच जमिनीत ओलावा कायम राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगतात.
यंदा जुलैपासून पावसाने जोर धरला असला तरी बळ्ळारीनाल्याला अद्याप मोठा पूर आलेला नाही. मात्र, बायपास रस्त्याच्या कामामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा विरोध, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रलंबित दावे असतानाही बायपासचे काम सुरू असल्याने भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात दावे दाखल असूनही सुनावणीला वारंवार विलंब होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आपली बाजू न्यायालयात मांडूनही निर्णय लांबत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय येळ्ळूर, धामणे, सुळगा, मच्छे आणि मजगाव परिसरातून येणारे पावसाचे पाणी बायपास परिसरात अडून वरील भागातील शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या शहरातील सांडपाणी, जलपर्णी आणि मोठ्या प्रमाणातील कचरा बळ्ळारीनाल्यात जमा होत आहे. मोठा पूर आल्यास हा सर्व कचरा शेतजमिनीत साचून सुपीक जमिनीचे आणि उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन तसेच प्रत्यक्ष नाल्याची पाहणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप केला आहे. बळ्ळारीनाल्याची तातडीने स्वच्छता, गाळ आणि जलपर्णी हटविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“बळ्ळारीनाल्यातील जलपर्णी, गाळ आणि कचरा तातडीने हटवला नाही, तर मोठा पूर आल्यावर हजारो एकर शेतीचे अपरिमित नुकसान होईल. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल.” असा इशारा शेतकरी नेते राजू मर्वे यांनी दिला आहे.




