बेळगाव लाईव्ह : शहरातील विविध विकास प्रकल्पांचा वेग, त्यातील अडथळे आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दौऱ्यादरम्यान नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्दरामय्या यांनी सुवर्ण विधानसौध येथे महत्त्वाची आढावा बैठक घेतली. महापालिका आणि बुडा यांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेताना रखडलेल्या प्रकल्पांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणांवर कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
शहरांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अनेक रस्ते खोदण्यात आले; मात्र कामे पूर्ण झाल्यानंतरही ते पूर्ववत करण्यात आले नसल्याची बाब बैठकीत पुढे आली. विशेषतः बेळगाव, धारवाड आणि कलबुर्गी येथे एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यावर मंत्री सिद्दरामय्या यांनी संताप व्यक्त करत, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास संबंधित कामांचा निधी रोखण्याचा इशारा दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था व कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी ग्रामीण भारत विकास योजनेतील अनेक कामांचा मुद्दा उपस्थित केला. कागदावर बहुतांश प्रकल्प पूर्ण झाल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना, कागदोपत्री प्रगतीपेक्षा प्रत्यक्ष काम पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याचे मंत्री म्हणाले. अपूर्ण प्रकल्पांची तातडीने पाहणी करून अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
रामतीर्थ नगरमधील बुडा वसाहतीचे महापालिकेकडे हस्तांतरण आणि तेथील प्रलंबित सुविधांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्थळाची पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर विकसित झालेल्या ले-आऊट्सना शासकीय रस्त्याची जोडणी मिळताना येणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा झाली. खासगी जमिनीमधून रस्ता काढण्याची आवश्यकता असल्यास ती जमीन संपादित करून सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याच्या पर्यायावर विचार करण्याचेही बैठकीत ठरले.
या बैठकीला महापौर प्रीती कामकर, आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





