बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील लोंढा रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या कामामुळे मंगळवारी रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पहिल्या प्लॅटफॉर्मवरील रुळांची जोडणी आणि विद्युत यंत्रणेच्या कामामुळे या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या तब्बल तीन तास उशिराने धावल्या. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या तांत्रिक कामामुळे अळणावर रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या दीर्घकाळ थांबविण्यात आल्या. बंगळुरू–बेळगाव सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. 20653) सकाळी 6.16 वाजता अळणावर येथे दाखल झाली होती. मात्र, ती 11.07 वाजता पुढील प्रवासासाठी रवाना झाली. त्याचप्रमाणे राणी चेन्नम्मा एक्सप्रेस (गाडी क्र. 16589) सकाळी 8.14 वाजता स्थानकात पोहोचली आणि 10.54 वाजता पुढे रवाना झाली.
गाड्या तात्पुरत्या स्वरूपात स्थानकावर थांबविण्यात आल्याने त्या नेमक्या केव्हा सुटणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी स्थानक प्रमुखांकडे धाव घेत नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी संतप्त प्रवासी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाल्याचे पाहायला मिळाले.

रेल्वेच्या विलंबामुळे दूरच्या प्रवासाला निघालेल्या अनेक प्रवाशांनी अखेर खासगी वाहने किंवा बसचा पर्याय स्वीकारत बेळगावसह आपल्या गंतव्यस्थानी जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, हुबळी–अळणावर आणि बेळगाव–अळणावर मार्गावरील बहुतांश रेल्वे गाड्या मंगळवारी सुमारे तीन तास उशिराने धावल्या. मात्र, हा विलंब केवळ मंगळवारपुरता असून बुधवारपासून सर्व रेल्वे गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील, अशी माहिती रेल्वे स्थानक प्रमुखांनी दिली.





