belgaum

SIR फॉर्म्सच्या अडचणींसाठी मए समितीचे मदत केंद्र;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सध्या सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहिमेअंतर्गत मतदारांना दिले जाणारे फॉर्म्स कन्नड भाषेत असल्याने मराठी भाषिक मतदारांना ते भरताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने वडगाव परिसरातील मराठी भाषिक मतदारांच्या मदतीसाठी पुढाकार घेत दररोज दोन तासांचे मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुरेश रेडेकर आणि माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत मराठी भाषिक मतदारांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ज्ञानेश्वर मंदिर येथे दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत समितीचे कार्यकर्ते उपस्थित राहून मतदारांना एसआयआर फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत. फॉर्म भरणे, आवश्यक माहिती समजावून सांगणे तसेच प्रक्रियेशी संबंधित इतर शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.

 belgaum

मराठी भाषिक मतदारांची गैरसोय होऊ नये आणि प्रत्येक पात्र मतदाराला प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे मदत केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील, सुनील बोकडे, विठ्ठल पोळ, कीर्तीकुमार कुलकर्णी, ज्ञानेश्वर मुन्नूर, भाऊराव पाटील, महादेव पाटील, तसेच माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुरेश रेडेकर यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.