belgaum

हिंडलगा कारागृहात वीर सावरकरांची प्रतिमा, नामफलक उभारावा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हिंडलगा येथील बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आणि नामफलक उभारण्यात यावा, तसेच बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरही त्यांच्या प्रतिमा स्थापित करण्यात याव्यात, अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

बुधवारी बेळगाव येथील सरकारी विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या मागण्यांसाठी येत्या १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासमोर वीर सावरकर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुतालिक म्हणाले की, १९५० साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंडलगा कारागृहात तीन महिन्यांचा कारावास भोगला होता. मात्र, त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये त्यांच्या स्मरणार्थ प्रतिमा किंवा नामफलक नसणे ही दुर्दैवी बाब असून हा सावरकरांसह देशभक्तांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला.

 belgaum

त्यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्र्यांनी हिंडलगा कारागृहातील सावरकरांना ठेवण्यात आलेल्या कोठडीला भेट देऊन तेथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले होते. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर ती प्रतिमा हटविण्यात आली आणि त्या विशेष कोठडीचा दर्जाही बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

पाच प्रमुख मागण्या

१३ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे राज्य सरकारकडे पुढील मागण्या करण्यात येणार असल्याचे मुतालिक यांनी स्पष्ट केले.

  • हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात वीर सावरकरांची प्रतिमा व नामफलक उभारावा.
  • बेळगाव बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर सावरकरांच्या प्रतिमा स्थापित कराव्यात.
  • शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याविषयी स्वतंत्र धडा समाविष्ट करावा.
  • सावरकरांच्या स्मृती जतन करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.
  • त्यांच्या कार्याचा गौरव करणारे उपक्रम राबवावेत.

मुतालिक यांनी सांगितले की, १३ जुलै १९५० रोजी सावरकरांची हिंडलगा कारागृहातून सुटका झाली होती. त्या दिवसाच्या स्मरणार्थ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य एन. रवीकुमार, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्यासह भाजपचे विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेळगाव परिसरातील देशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या धोरणांवर टीका करताना मुतालिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

यावेळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह श्रीराम सेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.