belgaum

मंगाई यात्रेपूर्वी रस्त्यांचे खड्डे बुजवा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: मंगाई नगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात मंगाई नगर रहिवासी संघ, महिला मंडळ तसेच स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेत धडक देत उपायुक्त उदयकुमार तलवार यांना निवेदन सादर केले.

यावेळी रहिवासी संघाचे अध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एल अँड टीकडून विविध भागांत खोदकाम करण्यात आले; मात्र आजतागायत ते खड्डे बुजविण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मंगाई नगर, वझे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, यल्लम्मा रोड, धामणे रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनचालक, पादचारी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रिक्षाचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचणे, गटारींचा निचरा न होणे, नळ दुरुस्तीचा प्रश्न, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक मूलभूत समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

 belgaum

“मंगाई यात्रेपूर्वी आमच्या सर्व समस्या सोडवा. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर मंगाई यात्रा संपल्यानंतर महानगरपालिका आणि एल अँड टी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा बंडू केरवाडकर यांनी प्रशासनाला दिला.

निवेदन स्वीकारल्यानंतर उपायुक्त उदयकुमार तलवार यांनी संबंधित विभागामार्फत या समस्यांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नागरिकांनी दिली.

मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन या समस्यांवर कितपत आणि किती लवकर उपाययोजना करते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.