बेळगाव लाईव्ह: कर्नाटक शहर पाणी पुरवठा व मलनिस्सारण मंडळातील (केयुडब्ल्यूएस) शेकडो कामगारांनी आज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गेल्या २० ते २५ वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांवर खासगी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शनं करत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.
पाच वर्षांपूर्वी शासनाने या विभागाचे व्यवस्थापन एका खासगी कंपनीकडे हस्तांतरित केले होते. तेव्हापासून या कंपनीकडून कामगारांची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
त्यातच कंपनीने १ जुलैपासून कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय ४५ अनुभवी आणि जुन्या कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अचानक बंद केली. यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर असूनही कर्तव्यापासून वंचित राहावे लागत असल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

या संदर्भात कामगार नेते महेश अनगोळकर यांनी कंपनीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. कंपनीने आतापर्यंत सुमारे ६०० नवीन कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती केली असून, मूळच्या ३६० जुन्या कामगारांना टप्प्याटप्प्याने सेवेतून काढून टाकण्याचा जाणीवपूर्वक कट रचला असल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या महिन्याचे हक्काचे वेतनही कंपनीने रोखून धरल्याने कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे थकीत वेतन त्वरित अदा करावे आणि सर्व जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीची लेखी सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठा विस्कळीत करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.





