belgaum

वेळेत आलो, तरी गेट बंद!’ KPSC परीक्षार्थींचा संताप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : देशभरात नीट परीक्षा घोटाळ्यानंतर स्पर्धात्मक परीक्षांमधील पारदर्शकता, परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश मिळतो का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर बेळगावातही अशाच स्वरूपाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शहरातील बेनस्मिक शाळेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) विभागीय परीक्षेदरम्यान गंभीर गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. अपंग महिला कर्मचाऱ्यासह तीन ते चार परीक्षार्थींना परीक्षा केंद्राच्या गेटबाहेरच थांबवण्यात आले आणि त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परीक्षार्थी कृपालिनी, या वाणिज्य कर विभागात कार्यरत असून त्यांनी सांगितले की, त्या सकाळी ९:५५ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचल्या होत्या. परीक्षा सकाळी १० वाजता सुरू होणार होती. मात्र, त्याआधीच सुरक्षा रक्षकाने गेट बंद केल्याने त्यांना केंद्रात प्रवेश मिळाला नाही.

 belgaum

यानंतर त्यांनी मुख्याध्यापिकांकडे वारंवार विनंती केली. मात्र, सुमारे १०:१५ वाजता मुख्याध्यापिका बाहेर आल्या आणि “उशीर झाला आहे” असे सांगत प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांना परीक्षेसाठी ‘Absent’ दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित परीक्षा ही नवीन नोकरीसाठी नसून खात्यांतर्गत (Departmental) पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा देता न आल्यामुळे आता पुढील परीक्षेसाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असून, त्यामुळे त्यांच्या वार्षिक वेतनवाढीवर (Increment) थेट परिणाम होणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या घटनेत अपंग महिला कर्मचाऱ्यासह एकूण तीन ते चार परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप असून, परीक्षा केंद्रावरील नियोजन आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षार्थी वेळेत पोहोचल्याचा दावा करत असताना त्यांना गेटबाहेरच थांबवण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. तसेच भविष्यात अशा महत्त्वाच्या स्पर्धात्मक आणि विभागीय परीक्षा खासगी किंवा अनुदानित शाळांऐवजी सरकारी शाळांमध्येच आयोजित कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

देशातील नीट परीक्षा घोटाळ्यानंतर परीक्षा व्यवस्थापनाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील ही घटना पुन्हा एकदा परीक्षा केंद्रांवरील नियोजन, प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षार्थींच्या हक्कांबाबत गंभीर चर्चा निर्माण करणारी ठरत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परीक्षार्थी आणि नागरिकांकडून होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.