बेळगाव लाईव्ह : शहरातील नवीन कोर्ट कॉम्प्लेक्ससमोरील अंडरपासमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुमारे २० ट्यूबलाईट्स दिवस-रात्र अखंड सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका बाजूला शहरातील अनेक भागांमध्ये दररोज दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत असताना, दुसऱ्या बाजूला दिवसा ढवळ्या सरकारी दिवे सुरू असल्याने नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माजी बेळगाव बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधत महानगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसांत सतत वीजप्रवाह सुरू राहिल्याने शॉर्टसर्किट, करंट लागणे किंवा इतर अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. हा अंडरपास दररोज शेकडो नागरिक वापरत असल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील अनेक भाग अंधारात असताना सरकारी मालमत्तेचा अशा प्रकारे होणारा विजेचा अपव्यय योग्य नाही. दिवसा ट्यूबलाईट्स सुरू असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत असूनही महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ॲड. दिवटे यांनी महानगरपालिकेला या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दिवसा ट्यूबलाईट्स बंद ठेवण्याची आणि केवळ रात्रीच सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. यामुळे विजेची बचत होईल, सरकारी मालमत्तेचे संरक्षण होईल आणि संभाव्य अपघातांचाही धोका कमी होईल.





