बेळगाव लाईव्ह : एखादा शिक्षक फक्त वर्गात धडे शिकवत नाही, तर संपूर्ण पिढी घडवतो… काकती येथील सरकारी शाळेतील किरण जी. करंबळकर यांच्या बाबतीतही ग्रामस्थ आणि पालकांची हीच भावना आहे. गेली १५ वर्षे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच शाळेच्या विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या या शिक्षकांच्या प्रस्तावित बदलीमुळे गावात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
करंबळकर यांनी शाळेत रुजू झाल्यानंतर केवळ अध्यापनावरच भर दिला नाही, तर शाळेच्या भौतिक सुविधांमध्येही मोठी भर घातली. सीएसआर निधीच्या माध्यमातून सभागृह उभारणे, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे, संरक्षण भिंत उभारणे, शाळेची रंगरंगोटी, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच पूर्वप्राथमिक विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शाळेचे स्वरूपच बदलल्याचे ग्रामस्थ सांगतात.
“सरांमुळे आमच्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या. सरकारी शाळेतही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, हा विश्वास त्यांनी निर्माण केला,” अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर शाळा विकास व व्यवस्थापन समिती (एसडीएमसी), पालक आणि ग्रामस्थांनी शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडे निवेदन सादर करून करंबळकर यांच्या बदलीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात शाळेत आधीच मराठी शिक्षकांची कमतरता असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्याध्यापक दिव्यांग असल्याने उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत करंबळकर यांची बदली झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शाळेच्या विकासाच्या गतीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
“शिक्षक बदलणे सोपे असते; पण विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करणारा शिक्षक मिळणे कठीण असते,” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी करंबळकर यांना काकती शाळेतच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.





