बेळगाव लाईव्ह : गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्यावा, गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रीपद निर्माण करावे आणि जखमी जनावरांसाठी २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करावी, या प्रमुख मागण्यांसाठी गो सन्मान अभियानाच्या वतीने सोमवारी बेळगावात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर १ लाख ८० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मोर्चापूर्वी कन्नड साहित्य भवन येथे स्वामीजींच्या हस्ते गाय व बैलाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, गोभक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत मोर्चा कन्नड साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आले.
आयोजकांनी सांगितले की, देशभर सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातून १.८० लाख स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या आहेत. यापूर्वी २७ एप्रिल रोजी तालुका स्तरावर ७ लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत सरकारकडे सादर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही मागण्यांची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
निवेदनात गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करणे, गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रीपद निर्माण करणे, राज्यातील सर्व गोशाळा सरकारी नियंत्रणाखाली आणणे, गाईंसाठी पुरेशा चाऱ्याची व्यवस्था करणे तसेच रस्त्यावर जखमी होणाऱ्या जनावरांसाठी २४ तास रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय डॉक्टरांची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २७ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये राज्यस्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
या मोर्चात गोरक्षक निलेश, मारुती कोळी, आनंद नवले, आनंद शेट्टी, सुरेंद्र भंडारी, प्रकाश लाडव, सूरज, मुकुंद, अरुण कुमार यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गोभक्त सहभागी झाले होते.





