बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कपिलेश्वर उड्डाण पुलाला लागून असलेल्या गंगा निवास इमारतीची दर्शनीय भिंत आज दुपारी अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आसपास कांही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्याच्या पावसामुळे अचानक कोसळलेल्या गंगा निवास इमारतीच्या दर्शनीय भिंतीबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या भिंतीचे अवशेष हटवले. सततचा पाऊस आणि दुपारची वेळ यामुळे सदर भिंत कोसळली त्यावेळी नागरिकांची वहिवाट नसल्यामुळे अनर्थ टळला.
तथापि अचानक कोसळलेल्या भिंतीमुळे आसपास कांही काळ घबराट पसरली होती. जुन्या आणि जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सावध राहणे गरजेचे आहे, कारण सततच्या पावसामुळे भिंती, स्लॅब, प्लास्टर आणि इमारतींची रचना कमकुवत होण्याचा धोका वाढतो.

अशा वेळी भिंतींना तडे, ओलावा, गळती, किंवा कोणतीही असामान्य हालचाल दिसल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला कळवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानेही धोकादायक इमारतींची तपासणी करून आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




