belgaum

‘चिखले धबधबा’ रौद्र रूपात!निसर्गाची अद्भूत जादूगिरी!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या आठ दिवसांपासून बेळगाव शहर आणि परिसरात मान्सूनने रौद्र आणि तितकेच देखणे रूप धारण केले आहे. सर्वत्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वनपरिक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या कुशीत निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे या भागातील नद्या, नाले आणि ओढे ओसंडून वाहत असून, निसर्गरम्य चिखले गावातील सुप्रसिद्ध ‘चिखले धबधबा’ आता आपल्या पूर्ण वैभवासह कड्यावरून झेपावू लागला आहे.

बेळगावपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेल्या चिखले गावापासून ३ किलोमीटरवर हा धबधबा २०० ते ३०० फूट उंचीवरून कोसळतो. साधारण १५०० ते २००० लोकसंख्या असलेल्या या शांत चिखले गावात सध्या पावसाचा तांडव सुरू आहे. पावसाचा जोर आणि सोसाट्याचा वारा इतका प्रचंड आहे की गावातील रस्ते निर्मनुष्य झाले असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. याच वातावरणात डोंगररांगांमधून फेसाळत येणारा हा धबधबा आणि त्याचा अंगावर शहारे आणणारा गर्जनायुक्त आवाज संपूर्ण परिसरात घुमत आहे.

या धबधब्याचे सर्वात मोठे आणि थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे, कड्यावरून खाली कोसळणारे पाणी खालील दरीतून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे पुन्हा हवेत उलट्या देशाने वर उडताना दिसते. हा निसर्गाचा अद्भूत खेळ पाहणे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते. एरवी या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना निसर्गरम्य छोट्या पायवाटांवरून आणि वाहत्या पाण्यातून थरारक मार्ग काढावा लागतो. वाहने घेऊन जाणाऱ्यांना चिखले गावापासून १ किलोमीटरवर असलेल्या फॉरेस्ट चेक पोस्टपाशी आपली वाहने पार्क करून पुढे तब्बल २ किलोमीटर जंगलातील वाटेने पायी जावे लागते.

 belgaum

हा ऋतू आणि हे विहंगम दृश्य म्हणजे पर्यावरण प्रेमी आणि निसर्गवेड्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते; मात्र सध्या बेळगाव जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून या धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना पूर्णपणे बंदी घातली आहे. मागील काही वर्षांत अनेक हुल्लडखोर तरुणांकडून अशा धोकादायक ठिकाणी होणारी हुल्लडबाजी, रिल्स बनवण्याचा अट्टाहास आणि सेल्फी काढण्याच्या नादात सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे काही दुर्दैवी अपघात घडले आहेत. या पार्श्वणीवर कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने चोख पावले उचलत फॉरेस्ट चेक पोस्टवर कडक निर्बंध लादले आहेत.

निसर्गाचे हे धुव्वाधार आणि फेसाळणारे रूप सध्या पर्यटकांना प्रत्यक्षात अनुभवता येत नसले, तरी चिखले धबधबा सध्या सह्याद्रीच्या कड्याकड्यांवरून आपले वेगळेच वैभव मिरवताना दिसत आहे. प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातलेली असल्याने नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, हुल्लडबाजी टाळावी आणि अशा संवेदनशील तसेच धोकादायक वनक्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जर वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी दाद दिली तर कदाचित काही अंशी लादण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जातील आणि या निसर्गाचा अद्भुत आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची संधी मिळू शकेल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.