belgaum

त्या..SIR बैठकीतील कथित वाद चिघळला

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या बैठकीत घडलेल्या कथित गैरवर्तनाच्या प्रकरणाने खानापूर तालुक्यात प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्नाटक राज्य पंचायत विकास अधिकारी (बी-ग्रेड) पदोन्नती संघटनेने खानापूरचे तहसीलदार दुंडप्पा कोमार यांच्याविरोधात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बेळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत शिस्तभंग कारवाईची मागणी केली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, 9 जुलै रोजी तालुका पंचायत सभागृहात SIR प्रक्रियेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंचायत विकास अधिकारी (PDO) आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्याऐवजी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांशी अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेचे म्हणणे आहे की, अधिकाऱ्यांना प्रश्न मांडण्याची संधी न देता त्यांना मोठ्या आवाजात सुनावण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी शांतपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही त्यांच्याशी उद्धटपणे वागण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 belgaum

तक्रारीत आणखी गंभीर आरोप करत, बैठकीत तहसीलदारांच्या वर्तनाला आक्षेप घेणाऱ्या काही पंचायत विकास अधिकाऱ्यांना धमकावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बैठक संपल्यानंतर सभागृहाबाहेरही वाद घालत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेने हा प्रकार अपवादात्मक नसल्याचाही दावा केला आहे. यापूर्वीही पंचायत विकास अधिकारी, महिला अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद वर्तन, सार्वजनिक बैठकीत अवमानकारक भाषा, तसेच विविध शासकीय बैठकीत अशाच प्रकारच्या घटना घडल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्भय वातावरणात काम करता येईल, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, संघटनेने केलेल्या आरोपांबाबत तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची अधिकृत भूमिका वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत समोर आलेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.